मुंबई : देशातल्या बिघडलेल्या वातावरणावर भाष्य करुन वादात सापडलेले दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. 'अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया' या मानवाधिकार संस्थेने नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मानवाधिकारासाठी लढणाऱ्या आवाजांना सरकार दाबत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या कथित नक्षल समर्थक आरोपींच्या समर्थनार्थ नसीरुद्दीन शाह उतरले आहेत. आजच्या घडीला देशात द्वेष आणि क्रूरतेने उच्छाद मांडला आहे. त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या घरी छापेमारी करुन त्यांची बँक खाती गोठवून त्यांचा आवाज दाबला जातो, असा आरोप शाह यांनी केला आहे. धर्माच्या नावाखाली द्वेषाच्या भिंती उभारल्या जात आहेत, निष्पापांची हत्या केली जात आहे, देशात द्वेष आणि अन्याय-अत्याचाराने कळस गाठला आहे, असंही नसीरुद्दीन शाह म्हणाले. दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांचे फोटो आहेत. त्यांना जेलमध्ये डांबून सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप नसीरुद्दीन यांनी केला आहे. 'अब की बार मानवाधिकार' या हॅशटॅगसह ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. यापूर्वीही त्यांनी देशातील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. 'समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे' असं नसीरुद्दीन शहा म्हणाले होते. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं होतं.